पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांचा शपथविधी होत आहे. या मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांच्या यादीत पहिला मान हा महाराष्ट्राला नारायण राणे यांच्या रुपाने मिळाला.नारायण राणे यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. तर, त्यांच्या शपथविधी होताच त्यांचे पुत्र निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आज दिवस हा चांगला दिवस आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नारायण राणे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. जबाबदारी जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्यावर आली, त्या जबाबदारीला १०० टक्के न्याय देण्याचं काम त्यांनी नेहमीच केलेलं आहे. माझी खात्री आहे यावेळेसही तसंच होईल.” अशी पहिली प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

खासदार नारायण राणे झाले ‘केंद्रीय मंत्री’

तर, “सर्वात प्रथम राणे कुटुंबीयांच्यावतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राणे कुटुंबीयांच्यावतीने मी मनापासून आभार मानतो. आज राणे कुटुंबीयांसाठी सुवर्णक्षण निश्चितपणे आहे, पण त्याच बरोबर एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांसाठी देखील महत्वाचा क्षण आहे, हे मला या निमित्त सांगायचं आहे.” अशा शब्दांमध्ये भाजपा आमदार नितेश राणे यांनी भावना व्यक्त केल्या.

Modi cabinet expansion : नारायण राणे यांना मिळणार शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं खातं

तसेच, “जसं मी आपल्याला अगोदर सांगितलं. नारायण राणे मुख्यमंत्री होतानाही अचानकच झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाही काही पूर्वकल्पना देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं नव्हतं. आजपर्यंत अनेक अधिकारी कार्यकर्ते हे तेव्हाचा काळ आठवतात. नारायण राणेंची काम करण्याची पद्धतच तशी राहिलेली आहे. जबाबदारी गंभीरपणे घेणे आणि ही देशाची सेवा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक पदाला फार गंभीरपणे घेतलं आणि आताही तसंच होईल. यासाठी काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांना पंतप्रधान मोदींनी जी जबाबदारी दिली आहे ती ते चोखपणे बजावतील, यामध्ये शंका नाही.” असं देखील निलेश राणे यांनी यावेळी सांगितलं.