आकाशात नेहमीच खगोलीय घटनांचे अद्वितीय खेळ पहायला मिळत असतात. यामध्ये ज्यांना रुची आहे किंवा ज्यांचा हा अभ्यासाचा विषय आहे, ते हा आनंद लुटण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अशीच एक अनोखी घटना आज (रविवारी) संध्याकाळी आकाशात उघड्या डोळ्यांनी पहाता येणार आहे. ही घटना म्हणजे आपल्या सूर्यमालेतील पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसू शकणार आहेत. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

संबंधित वृत्तानुसार, खगोलशास्त्रज्ञ आर. सी. कपूर यांनी सांगितले की, “रविवार, १९ जुलै रोजी सूर्यास्तापूर्वी आपल्या सूर्यमालेतील ५ ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत.” एकाच रात्री पाच ग्रह स्पष्टपणे पाहता येणे ही घटना एक खगोलीय चमत्कार असल्याचेही कपूर यांनी म्हटले आहे. सूर्यास्ताच्या साधारण अर्ध्यातासापूर्वी ठळक चमकणारा ग्रह आकाशात दिसेल तो शुक्र ग्रह असणार आहे. त्यानंतर क्षितिजाजवळ बुध ग्रहाजवळ चंद्रकोरही दिसणार आहे. बुध ग्रह हा सहसा उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. पण जर आकाश स्वच्छ असेल तर आज संध्याकाळी तो उघड्या डोळ्यांनी सहज दिसेल.

यावेळी मंगळ ग्रह देखील आकाशाच्या मध्यभागी दिसू शकणार आहे. त्याचबरोबर गुरु आणि शनि हे ग्रह पश्चिम क्षितिजावर थोड्या वरच्या बाजूला उघड्या डोळ्यांनी दिसू शकणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही पाच ग्रह उघड्या डोळ्यांनी आकाशात पाहू शकणार आहात. यासाठी कुठल्याही दुर्बिणीची गरज भासणार नाही. पण जर तुमच्याकडे दुर्बिण असेलच तर तुमच्यासाठी ते फायद्याचं असेल.