भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांची कामगिरी

आगामी काळात छोटय़ा अवकाश मोहिमा व्यक्तिगत पातळीवरही राबवता येणार असून हौशी व विज्ञानाची आवड असणारे लोक छोटे उपग्रह कमी किमतीत अवकाशात पाठवू शकणार आहेत. सन क्यूब फेमटोसॅट हा तीस सेंटिमीटर आकाराचा घनाकृती उपग्रह अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे जेकन थंगा व अमन चंद्रा यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांच्या मते आता असे छोटे उपग्रह सोडणे ही खर्चिक बाब राहणार नाही. या उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा व इतर खर्च सध्या एका किलोमागे ६० ते ७० हजार डॉलर्स आहे. सनक्यूब फेमटोसॅट या उपग्रहाचा खर्च आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पाठवण्यासाठी १००० डॉलर, तर पृथ्वी नजीकच्या कक्षेत पाठवण्यासाठी ३ हजार डॉलर्स इतका कमी असणार आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर उपग्रह सोडण्यास २७ हजार डॉलर्स खर्च येणार आहे. सनक्युब फेमटोसॅट या उपग्रहाच्या भागांचा खर्च काही शेकडा डॉलर्स इतकाच आहे. एखाद्या गॅरेजमध्ये काम करणारा हौशी तंत्रज्ञही असा उपग्रह अवकाशात पाठवू शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. सौरपट्टय़ा हव्या त्या आकारात उपलब्ध नसतात पण संशोधक उत्पादकांकडून त्यांचे सुटे तुकडे अगदी कमी किमतीत घेऊ शकतात, कारण हे तुकडे शेवटी भंगारात जाणार असतात. कमी खर्चाच्या उपग्रहात लोकांना रस आहे व असे उपग्रह वापरून नंतर वाया गेले तरी चालतील अशा स्वरूपाचे असतील, असे थंगा यांनी सांगितले. स्मार्टफोन तंत्रज्ञानामुळे उपग्रहांचा आकार आता लहान लहान होत चालला असून त्यामुळे अवकाश प्रयोगांसाठी विद्यार्थीही उपग्रह पाठवू शकतील. यात चुका झाल्या तरी चालतात कारण त्या पुढच्यावेळी दुरूस्त करता येतात व मोठा खर्च वाया जात नाही. थंगा यांच्या मते फेमटोसॅट ही लघुउपग्रहांची सुरूवात आहे. हे उपग्रह इ कॉमर्स संकेतस्थळावर विक्रीसही ठेवता येतील.

माध्यमिक शाळातील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थीही उपग्रह तयार करू शकतील अशी स्थिती निर्माण होणार आहे. कृत्रिम गुरूत्व प्रयोगासाठी लहान सेंट्रीफ्युजेस ते तयार करू शकतील. अवकाश प्रतिमाचित्रणासाठीही फेमटोसॅटचा उपयोग शक्य होणार आहे. या छोटय़ा उपग्रहांच्या मदतीने मोठय़ा उपग्रहातील बिघाड शोधता येतील असे त्यांनी सांगितले.