उत्तरप्रदेशातील लखनऊमध्ये १३ वर्षांच्या एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या ‘ब्लू व्हेल’ या गेममुळे केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आदित्य असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो लखनऊ येथील इंदिरा नगर भागात असलेल्या आदित्य निर्मला इंग्रजी शाळेत शिकत होता.

अभ्यासात फारशी प्रगती न करणारा आदित्य बऱ्याचदा त्याच्या आईच्या मोबाइलवरच गेम खेळत असायचा अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. आदित्यचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ‘ब्लू व्हेल’ या गेममुळेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने आदित्यच्या आत्महत्येसंदर्भातील बातमी त्यांच्या वेबसाइटवर दिली आहे.

३ सप्टेंबर रोजी सात्विक पांडे या मुलाने ट्रेन खाली उडी मारून ‘ब्लू व्हेल’ गेम मुळेच आपले आयुष्य संपविल्याचा अंदाज व्यक्त होत होता. अवघ्या पाच दिवसातच ‘ब्लू व्हेल’ गेममुळे दुसरी आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. १२ ते १६ या वयोगटातील मुलांकडे असलेल्या स्मार्ट फोनमध्ये हा गेम डाऊनलोड करण्याचे प्रमाण आणि या गेममुळे त्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण जास्त आहे.

मुंबईत मनप्रीत नावाच्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती त्यानंतर देशभरात या गेममुळे आत्महत्या केल्याच्या आत्तापर्यंत ७ ते ८ घटना समोर आल्या आहेत.

नेमका आहे तरी काय आहे हा ‘ब्लू व्हेल’ गेम?

ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला एक मास्टर मिळतो

अँड्रॉईडवरून हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही.

रक्ताने ब्लू व्हेल कोरणे, भीतीदायक सिनेमा पाहणं असे टास्क दिले जातात

गेमचा मास्टर ५० दिवस प्लेयरवर नियंत्रण ठेवतो आणि सगळे टास्क पूर्ण करायला भाग पाडतो

हा गेम एकूण ५० लेव्हल्सचा आहे, यातील ५० वी लेव्हल आत्महत्या करणे आहे.