डॉलरच्या तुलनेत रूपयात सातत्याने होत असलेली घसरण आणि निर्यातीसाठीच्या कर्जात घट झाल्यावरून मंगळवारी काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाही सरकार अजूनही ‘गंभीर आर्थिक’ संकट मान्य करण्यास नकार देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी याप्रकरणी ट्विट केले. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रूपयातील घसरण सुरूच आहे. तर दुसरीकडे निर्यातीसाठीच्या कर्ज सुविधेतही ४७ टक्के घट दिसून आली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. तरीही मोदी सरकारने मौन राखले आहे. गंभीर आर्थिक संकट निवारणे दूरच पण हे सरकार हे स्वीकारण्यासही तयार नाही. हे अपयशी ‘मोदीनॉमिक्स’चा (मोदींचे अर्थशास्त्र) परिणाम आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशातील स्टील कंपन्यांना स्वस्त आयातीपासून वाचवण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांवरूनही त्यांनी हल्लाबोल केला. सामान्य स्टील उपयोगकर्त्यांच्या किंमतींवर किती फायदा कमवला गेला पाहिजे हे पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि स्टील मंत्रालय सांगू शकेल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.