सध्या जगभरात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेला सर्वाधिक हानी झाली आहे. तर दुसरीकडे ब्राझिलमध्येही करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ती आता १० लाखांच्या वर गेली आहे. ब्राझिलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५४ हजार ७७१ नवे करोनाबाधित सापडले. तसंच २४ तासांत १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, ब्राझिलमध्ये आतापर्यंत ४८ हजार ९५४ जणांना मृत्यू झाला आहे.

ब्राझिलमध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. तसंच अमेरिकेतही करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या २२ लाखांवर गेली आहे. तर रशियातही करोनाबाधितांची संख्या ५ लाख ६९ हजार ६३ वर पोहोचली आहे. तर रशियातही मृतांची संख्या ७ हजार ८४१ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे भारतातही मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्येही करोनाबाधितांची संख्या ३ लाखांवर गेली आहे.

भारतात सर्वाधिक नव्या रूग्णांची नोंद

भारतात शुक्रवारी सर्वाधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. शुक्रवारी भारतात १४ हजार ५१४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर यादरम्यान ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भारतातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३ लाख ९५ हजार ०४८ वर पोहोचली आहे. तर यापैकी सध्या १ लाख ६८ हजार २६९ अॅक्टिव्ह केसेस आहे. आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांनी करोनावर मात केली असून मृतांची एकूण संख्याही १२ हजार ९४८ झाली आहे.