News Flash

२६/११ च्या हल्ल्यात शौर्य गाजवलेला जवान दिल्लीत लढणार राष्ट्रवादीच्या तिकिटावर

मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या या एनएसजी कमांडोने सन २०१३ मध्ये आपच्या तिकीटावर दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती.

नवी दिल्ली : मुंबई हल्ल्यातील हिरो असलेले माजी एनएसजी कमांडो सुरेंदर सिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

मुंबई हल्ल्यातील (२६/११) हिरो माजी एनएसजी कमांडो आणि आपचे आमदार सुरेंदर सिंह  हे पुन्हा एकदा दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, यावेळी ते आम आदमी पार्टीकडून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ही निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी स्वतः याची माहिती दिली.

दिल्लीचे आमदार आणि माजी आप नेते असलेले सुरेंदर सिंह यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. “आपल्याला अनेक पक्षांकडून यासाठी ऑफर होती मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केली असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्या (बुधवारी) याबाबत माहिती देईन” असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपने त्यांना पुन्हा तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या सुरेंदर सिंह यांनी मंगळवारी ट्विटद्वारे आपण आपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. आपल्या राजीनाम्याचे पत्र दाखवत त्यांनी लिहिले की “आज मी खूपच दुःखी आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत आहे.”

मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी दोन हात करणारे एनएसजी कमांडो सुरेंदर सिंह यांनी सन २०१३ मध्ये आपच्या तिकीटावर दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंगातून भाजपाच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या करन सिंह तन्वर यांचा पराभव केला होता.

‘ताज’मध्ये कसाबशी लढताना गंभीर जखमी झाल्याने आले अपंगत्व

मुंबई हल्ल्यावेळी ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना सुरेंदर सिंह गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले होते. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव त्यांना भारतीय लष्कराच्या सेवेतून निवृत्ती घ्यावी लागली होती. त्यानंतर १९ महिने त्यांना पेन्शन मिळाली नव्हती. यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे उंबरे झिजवले मात्र त्यांना कोणीही मदत केली नव्हती. त्यानंतर ते आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आले. त्यांच्यासमोर आपली समस्या त्यांनी मांडली त्यानंतर त्यांना काही काळानंतर पेन्शन सुरु झाली होती. यामुळे प्रभावित होऊन त्यांनी त्यावेळी आपमध्ये प्रवेश केला होता. तसेच पक्षाने त्यांना उमदेवारी दिली होती यात त्यांनी यशही मिळवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 4:42 pm

Web Title: the hero of mumbai attack will fight the delhi assembly elections on the ticket of ncp aau 85
Next Stories
1 व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉलगर्लला बोलावले आणि आली पत्नी
2 तान्हाजीच्या वादात तैमूरचं नाव; सैफ अली खानला भाजपानं दिलं उत्तर
3 धक्कादायक! वर्षभरात सुमारे ८००० व्यावसायिकांनी संपवले स्वतःचे जीवन
Just Now!
X