पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा संघावर आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. संघ आणि भाजपा यांच्यातलं नाझी कनेक्शन जाणून घ्यायचं असेल तर गुगल करा आणि नाझींची विचारसरणी काय होती ते पाहा. ते पाहिलंत की तुम्हाला लक्षात येईल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांची विचारसरणी ही नाझींशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाचं नाझींशी कनेक्शन काय आहे ते समजू शकेल असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

गांधी नेहरुंचा देश असलेल्या भारतावर आता हिंदुत्त्ववादी असलेले  मोदी राज्य करत आहेत. त्यांची विचारसरणी ही देशासाठी आणि मुस्लिमांसाठी घातक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी आहेत ते पाकिस्तान आणि भारतात असलेल्या सगळ्या मुस्लिमांसाठी ते एका संकटासारखेच आहेत. आरएसएस आणि भाजपा यांची विचारधारा ही नाझी म्हणजेच हिटलरच्या विचारसरणीवरुन प्रेरित आहे याबाबत तुम्ही गुगल केलंत तरीही तुम्हाला माझ्या म्हणण्याचा अर्थ लागेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

रविवारीच एक ट्विट करत फॅसिस्ट मोदींच्या हाती अण्वस्त्र सुरक्षित आहे का? या गोष्टीची आंतरराष्ट्रीय समुदायाने नोंद घ्यायला हवी असं इम्रान खान यांनी म्हटलं होतं. काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट सुरु आहे. गेल्या आठवड्यातही इम्रान खान यांनी भाजपा आणि संघावर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी संघाची आणि भाजपाची विचारधारा नाझी म्हणजेच हिटलरच्या विचारसरणीवर अनुसरलेली आहे असं इम्रान खान यांनी म्हटलंय.