फिलिपीन्समध्ये नवीन अध्यक्षांच्या निवडीवेळी मतदान सुरू असताना अनेक ठिकाण्ी शाळा व मतदान केंद्राच्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. प्रस्थापित विरोधी लाटेत धडाकेबाज नेते रॉड्रिगो डय़ुटेर्ट यांना अनुकूलता दिसत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर १८ हजार जागाही भरल्या जाणार आहेत. त्यात नगरसेवकापर्यंतच्या पदांचा समावेश आहे. दशकभराच्या हुकूमशाहीतून बाहेर पडलेल्या फिलिपीन्सने लोकशाही मजबूत होण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. डय़ुटर्ट हे दक्षिणेकडील दवाओ शहराचे प्रदीर्घ काळ महापौर होते. त्यांनी देशातील गुन्हेगारी व दारिद्रय़ावर झटपट उपाय करण्याचे वचन देऊन मतदारांना संमोहित केले होते. गेल्या काही वर्षांत आर्थिक वाढ चांगली होऊनही गुन्हेगारी व दारिद्रय़ वाढले आहे. त्यांच्या टीकाकारांनी म्हटले आहे, की ते देशाला परत हुकूमशाहीच्या काळय़ाकुट्ट काळात नेतील. १९८६ मध्ये अशाच लोकशक्तीच्या क्रांतीनंतर फर्डिनंड मार्कोस यांची सत्ता आली होती. डय़ुटर्ट हे आधी उपरे मानले जात होते, पण नंतर जनमत सर्वेक्षणात त्यांचे नाव वर गेले. हजारो गुन्हेगारांना ठार मारीन, कुणी माझे ऐकले नाही तर एकछत्री अंमल चालवीन, कम्युनिस्ट बंडखोरांना जवळ करीन अशी सनसनाटी आश्वासने त्यांनी दिले आहेत. पण त्यामुळे हुकूमशाहीचा उदय होण्याची भीती विरोधकांना वाटते. डय़ुटर्ट यांच्या व्हायग्रा या लैंगिक उत्तेजक गोळीचा मसाला असलेल्या लफडय़ांची चर्चा असताना त्यांनी सांगितले, की मी माझ्या बायकांना साध्या घरांमध्ये ठेवतो, कमी काळासाठी त्यांना हॉटेलमध्येही ठेवतो. १९८९ मध्ये फिलिपीन्समधील तुरुंगातील दंगलीत मारल्या गेलेल्या सुंदर ऑस्ट्रेलियन दूतावर मला बलात्कार करण्याची इच्छा होती, असे ते विनोदाने म्हणाले होते, पण त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात खळबळ उडाली होती.