मंदी आली आहे, अर्थव्यवस्था ढासळली आहे अशी टीका आपल्या देशावर विरोधकांकडून कायमच केली जाते. विरोधक यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. मात्र जगाचा अभ्यास करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मंदी फक्त भारतात नाही तर जगभरात आहे. जगातल्या बहुतांश देशांना मंदीचा सामना करावा लागतो आहे. जगाची अर्थव्यवस्था ढवळून निघाली आहे. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

भारतात व्यवहार करणे आता सोपे झाले आहे. आर्थिक सुधारणेची प्रक्रिया बहुतांश प्रमाणात ऑटोमॅटिक झाली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातली माहिती दिली. जीएसटीची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम वेगाने सुरु आहे. अर्थव्यवस्थेतली सुधारणा हा सरकारचा पहिला अजेंडा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कॅपिटल गेन्सवरचा सरचार्ज मागे घेण्यात आल्याचंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा उत्साह वाढेल असाही विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला. एवढंच नाही तर केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताची अर्थव्यवस्था बळकट कशी होईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत असंही सीतारामन यांनी सांगितलं.

जगभरातले अनेक देश मंदीचा सामना करत आहेत. बाजारात रोखीचे संकट आहे, ऑटो सेक्टरमध्येही मंदी आहे. कारची विक्री गेल्या २० वर्षांमध्ये घटली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होतो आहे. खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांवरही टांगती तलवार आहे. रिअल इस्टेटमध्येही मंदी आहे असंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. तरीही जगाचा विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे असं त्या म्हटल्या आहेत.