ओडिशातील प्रसिद्ध सूर्य मंदिराविरोधात टिपण्णी केल्याने धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली ओडिशाच्या विधानसभेत पत्रकार अभिजीत अय्यर मित्रा यांच्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणण्यात आला असून त्यानुसार त्यांच्यावर अटकेची कारवाईही करण्यात आली आहे. मित्रा यांच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधीपक्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली गृहसमिती नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याप्रकरणी मित्रा यांच्या वकिलांनी सांगितले की, अभिजीत अय्यर यांच्यावर निजामुद्दीन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार अभिजीत अय्यर मित्रा यांनी कोणार्कच्या सूर्य मंदिर आणि ओडिशा राज्याच्या संदर्भात एक आक्षेपार्ह व्हिडीओ ट्विटरवरुन प्रसिद्ध केला होता. या ट्विटवर ओडिशातील लोकांव्यतिरिक्त अनेक ट्विटर युजर्सने तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या.

आपल्या ट्विटमध्ये मित्रा यांनी लिहीले होते की, ओडिशाचा शोध बंगाली संशोधकांनी लावला होता. त्यांनी याला ओरिशाला म्हटले होते. त्यावरुनच याचे ओडिशा हे नामकरण झाले. त्यांनी पुढे म्हटले होते की, ओडिशा अशी कोणती गोष्ट नाही. तो केवळ अविभाजीत बंगालचा जंगली दक्षिणी प्रांत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मित्रा यांच्या अटकेची मागणी करताना बिजू जनता दलच्या (बीजेडी) कार्यकर्त्यांनी विधानसभेत महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर निषेध आंदोलन केले. तसेच राज्यभर पत्रकार मित्रा यांचे पुतळेही जाळण्यात आले.