हरिद्वार येथून निघालेली किसान क्रांती यात्रा अखेर दिल्लीतील किसान घाट येथे जाऊन संपवण्यात आली. शेतकऱ्यांनी किसान घाट येथे फुले वाहून आपले आंदोलन संपल्याचे जाहीर केले. भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी हे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. हे सरकार शेतकरी विरोधी असून त्यांनी आमची कोणतीच मागणी मान्य केलेली नाही. आम्ही हे आंदोलन आता मागे घेत आहोत. आंदोलक शेतकऱ्यांनी आपापल्या घरी परतावे असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेश सीमेवरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला.

दरम्यान, किसान क्रांती यात्रा घेऊन किसानघाटला जाऊन तेथून संसदपर्यंत मोर्चा नेण्याचे नियोजन केलेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये मंगळवारी हिंसक संघर्ष दिसून आला. शेतकऱ्यांना दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि दिल्ली या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अखेर मंगळवारी रात्री सुमारे १२.३० वाजता पोलिसांनी बॅरिकेड्स बाजूला केले आणि शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यास परवानगी दिली.

अचानक बॅरिकेड्स बाजूला केल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. हातात बॅनर घेत घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी राजघाटकडे प्रस्थान केले. ‘दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना आपल्या सीमेत येण्याची परवानगी दिली आहे. पण कोणत्या अटींवर हा प्रवेश देण्यात आला, याची माहिती नसल्याचे’ गाझियाबाद सीमेवर गाझियाबादचे विभागीय पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी म्हटले.

रात्री उशिरा दिल्लीत प्रवेश देण्यात येत असल्याचे समजताच रस्त्यांवर झोपलेले शेतकरी जागे झाले आणि त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीकडे कूच केली. रात्री उशिरापर्यंत यूपी गेट आणि लिंक रस्त्यावर ३००० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मते, शेतकऱ्यांनी दगडफेक केली. त्याला उत्तर देताना पोलिसांनी अश्रूधूर सोडला, पाण्याचा मारा, लाठीचार्ज आणि रबराच्या गोळ्याही झाडल्या. ट्रॅक्टरमधील हवा काढण्यात आली. सुमारे अर्धा तास तणावाचे वातावरण होते. यात १०० हून अधिक शेतकरी जखमी झाले. यातील काही जण गंभीरही आहेत. तर दिल्ली पोलिसांमधील एका सहायक आयुक्तासह ७ पोलीस कर्मचारी जखमी आहेत.