भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारने टिकटॉसह 59 चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली. या बंदीमुळे चीनला आर्थिक फटणार बसणार की नाही याबाबत बरीच चर्चा सुरू असताना, आता चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने या बंदीमुळे टिकटॉकची मालकी असलेल्या ByteDance कंपनीला मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं आहे.

“भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. यामुळे टिकटॉकची मदर कंपनी असलेल्या ByteDance ला 6 अब्ज डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती ग्लोबल टाइम्सने ट्विटरद्वारे दिली आहे.

 (CamScanner, TikTok वरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट)

टिकटॉकसह 58 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाची अमेरिकेतही दखल घेण्यात आली आहे. काही अमेरिकी खासदारांनी अमेरिकन सरकारला भारतासारखाच निर्णय घेण्याची विनंती केली आहे. हे चिनी शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अ‍ॅप राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे या सदस्यांचे मत आहे. काँग्रेसमधील रिपब्लिकन सदस्य रिक क्रॉफर्ड यांनी टिकटॉक बंद झाले पाहिजे असे म्हटले आहे. मागच्या आठवडयात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी चीन सरकार आपल्या फायद्यासाठी टिकटॉकचा वापर करते असा आरोप केला होता. अमेरिकेत जवळपास टिकटॉकचे 4 कोटी वापरकर्ते आहेत.

दरम्यान, वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे 59 अ‍ॅप्सवर बंदी घालून भारताने चीनला दणका दिला आहे. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सचाही समावेश आहे. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असून ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘69अ’ मधील तरतुदींचा आधार घेत 59 अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.