दिल्लीत मागील तीन दिवसांत उफाळलेल्या हिंसाचाराने जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला तर १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस. मुरलीधर यांची काल रात्री उशीरा बदली करण्यात आली. याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

“न्यायाधीश मुरलीधर यांची मध्यरात्री करण्यात आलेली बदली सध्याच्या व्यवस्थेमुळे धक्कादायक नाही. परंतु ही बाब खरोखर दुःखद व लाजिरवाणी आहे. लाखो भारतीयांचा संवेदनक्षम व प्रामाणिक न्यायवस्थेवर विश्वास आहे. मात्र, सरकारकडून न्याय दडपण्याचा व  विश्वासला तडा देण्याचा प्रकार केला जात आहे, जो की निषेधार्ह आहे.” असं प्रियंका गांधी यांनी ट्विट करून यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. न्यायाधीश मुरलीधर यांची पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आलेली आहे.

राष्ट्रपतींनी सरन्यायाधिशांशी चर्चा करुन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरिणाया उच्च न्यायलयात केल्याचे या आदेशात म्हटलं आहे. न्या. एस. मुरलीधर यांनी तातडीने पदभार स्वीकारावा असंही यामध्ये म्हटलं आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. ही सुनावणी संध्याकाळच्या सुमारास संपली त्यानंतर रात्री साडे अकरा पावणेबाराच्या सुमारास न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश आले.

आणखी वाचा – भाजपाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधिशांची केंद्राकडून सहा तासांत बदली

प्रक्षोभक विधाने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, असा सवाल उपस्थित करणारे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी रात्री उशीरा जारी करण्यात आले. हे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

आणखी वाचा – दिल्ली हिंसाचार: दंगलग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारांनी उघडली दारे

दरम्यान एका रात्रीत न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश देण्यात आल्याचे बोलले जात असले तरी यासंदर्भातील प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासूनच सुरु झाली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. न्या. मुरलीधर यांच्याबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. रवी विजयकुमार मलीमथ यांच्या बदलीची शिफारस १२ फेबुवारी रोजीच करण्यात आली होती.