इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पंतप्रधान मोदी २०१५-१६ च्या यादीतही पहिल्या स्थानावर कब्जा केला होता. पंतप्रधान मोदींनी २०१६-१७ मध्येही अव्वल स्थान कायम राखले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा दुसऱ्या स्थानावर आहेत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत मागील वर्षी अमित शहा तिसऱ्या स्थानावर होते, तर सरसंघचालक मोहन भागवत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र यंदा अमित शहा यांनी मोहन भागवत यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, त्यामुळे यंदा मोहन भागवतांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मोदी आणि शहा जोडीने निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी विरोधकांसोबतच स्वपक्षातील अनेकांनाही मागे टाकले आहे.

नक्की वाचा- The Most Powerful Indians in 2017, 1 to 50: Narendra Modi tops, Yogi Adityanath enters list

२०१५-१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांना विरोधकांकडून काही प्रमाणात राजकीय आव्हान मिळाले होते. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत तब्बल २८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या पंतप्रधान मोदींना २०१५-१६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार-लालू प्रसाद यादव यांनी यशस्वी टक्कर दिली. मात्र पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे करणाऱ्या या नेत्यांची आता घसरगुंडी उडाली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत केजरीवाल गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ वरुन ३३ स्थानी घसरले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती ३० व्या स्थानावरुन ५० व्या स्थानावर गेल्या आहेत. तर लालू प्रसाद यादव २६ व्या क्रमांकावरुन ४२ व्या स्थानी घसरले आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीदेखील घसरण झाली आहे. मागील वर्षी ५ व्या क्रमांकावर असणाऱ्या सोनिया गांधी यंदाच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आहेत. तर गेल्या वर्षी ९ व्या क्रमांकावर असलेले राहुल गांधी यंदा १० व्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी यंदा यादीत थेट ८ वे स्थान पटकावले आहे.

आसाममधील निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि भाजपच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हिमांता बिस्वा सर्मा यांना इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत ३७ वे स्थान मिळवले आहे. पंतप्रधान मोदींचा विजयरथ बिहारमध्ये अडवून धरणारे मुख्यमंत्री नितीश कुमार यंदाच्या यादीत १३ व्या स्थानी आहेत. गेल्या वर्षी ते १२ व्या स्थानी होते. नितीश कुमार भाजप विरोधी आघाडीचा चेहरा समजले जातात.

अराजकीय व्यक्तीमत्त्वांचा विचार केल्यास पहिल्या १०० नावांमध्ये अभिनेत्री कंगणा रणौतचा समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या १०० सामर्थ्यवान व्यक्तींमध्ये ९० पुरुष आणि १० महिलांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खेहर यांनी यंदाच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. तर न्यायमूर्ती लोढा या यादीत ७८ व्या स्थानी आहेत.