कर्नाटकात निकालाच्या दिवशी काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी केली तेव्हाच लोकशाहीची हत्या झाली असा ट्विट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला. कर्नाटकात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या पक्षाचा इतिहास नक्कीच माहित नसेल किंवा आठवत नसेल. देशावर आणीबाणी लादणारा, कलम ३५६ चा गैरवापर करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

कर्नाटकात १०४ जागा मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अशात जेडीएस या ३७ जागा मिळवणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत काँग्रेसने त्यांच्यासोबत हातमिळवणी केली त्याच दिवशी लोकशाहीची हत्या झाली असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी भाजपाबाबत जे ट्विट केले होते त्या ट्विटला अमित शाह यांनी असे उत्तर दिले आहे.

काँग्रेस हा सत्तेसाठी संधीसाधू असलेला पक्ष आहे. त्याचमुळे त्यांनी तशीच ऑफर जेडीएसपुढे ठेवली. लोकशाहीसाठी हे उदाहरण अत्यंत लाजिरावणे आहे असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. गुरुवारी सकाळीच बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मात्र निकालाच्या दिवसापासूनच कर्नाटकात राजकीय नाट्य रंगले. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले. मात्र बुधवारी राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपालाच सत्तास्थापनेसाठी बोलावले. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला १५ दिवसांची मुदतही देण्यात आली. त्यामुळे काँग्रेस आणि जेडिएसचे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे स्वप्न भंगल्यात जमा आहे. अशात निवडणूक प्रचारा दरम्यान भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. अशात आज अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकेचे ताशेरे झाडले आहेत.