माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र

करोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी करोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही मनमोहन यांनी केली आहे.

भारताने आपल्या लोकसंख्येच्या एका लहान भागाचेच लसीकरण केल्याचे मनमोहन यांनी लक्षात आणून दिले. योग्य धोरणात्मक रचनेमुळे आपण बरेच चांगले आणि त्वरेने काम करू शकू. करोनाविरुद्ध लढण्यासाठी खूप गोष्टी करण्याची गरज आहे, परंतु लसीकरण हा त्यातील एक मोठा भाग आहे, असेही मनमोहन यांनी म्हटले आहे.

सध्या फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने, ४५ वर्षांपेक्षा कमी वय असले तरीही आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्यांना देण्यात यावी, अशी सूचना मनमोहन यांनी केली. ते म्हणाले की, काही राज्यांना शालेय शिक्षक, बसचालक, तीनचाकी वाहने, टॅक्सीचालक, महापालिका-पंचायत कर्मचारी आणि वकील ज्यांना न्यायालयीन सुनावण्यांसाठी उपस्थित राहावे लागते त्यांनाही आघाडीवरील कर्मचारी समजून त्यांचे वय ४५ वर्षांखाली असले तरी त्यांना लस दिली जाऊ  शकते.

केंद्राने येत्या सहा महिन्यांत मागवलेल्या लशींच्या मात्रा आणि मिळालेला साठा यांची आकडेवारी जाहीर करणे आवश्यक आहे. लशींचा पुरवठा राज्यांना कसा केला जातो, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे, अशी सूचनाही माजी पंतप्रधानांनी केली. सहा महिन्यांत आपल्याला लसीकरणाचे संख्यात्मक लक्ष्य गाठायचे असेल तर लसमात्रांची पुरेशी मागणी आधीच नोंदवणे आवश्यक आहे, जेणेकरून उत्पादक ठरलेल्या वेळी त्यांचा पुरवठा करू शकतील, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

राज्यांना अपेक्षित असलेला लसपुरवठा पारदर्शक सूत्रानुसार कसा केला जाईल, हे सरकारने पाहावे, असा सल्लाही मनमोहन यांनी दिला. आपत्कालीन परिस्थितीत गरजेनुसार वापर करण्यासाठी केंद्र सरकार दहा टक्के लससाठा राखून ठेवू शकते, अशी सूचना मनमोहन यांनी केली. राज्यांकडे लशींच्या संभाव्य उपलब्धतेबाबत स्पष्ट माहिती असावी, जेणेकरून ती लसीकरणाचा कार्यक्रम आखू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

‘संख्या नव्हे, प्रमाण पाहा’

लसीकरण  वाढवणे ही करोनाविरोधातील लढय़ातील गुरुकिल्ली आहे. त्यामुळे लसीकरण केलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येकडे न पाहता एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही मनमोहन यांनी नमूद केले आहे.

लस उत्पादन वाढवण्यासाठी..

सरकारने अनेक कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना द्यावा. त्यामुळे लस उत्पादन वाढू शकेल. त्याचबरोबर परदेशातील मान्यताप्राप्त लशींना चाचण्याची अट न घालता भारतात मुभा द्यावी, अशी विनंतीही मनमोहन यांनी केली.

सरकार चांगल्या सूचना खुलेपणाने स्वीकारते की नाही, हे या पत्राची दखल घेऊन कार्यवाही केली गेली तर समजू शकेल. त्याचप्रमाणे करोना साथ रोखण्याबाबत सरकार गंभीर आहे की नाही हेही त्याच्या प्रतिसादावरून कळेल.         – डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान