दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाल्याचे वृत्त गुजरात पोलिसांनी फेटाळले आहे. काही प्रसारमाध्यांनी  ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन झालेल्या वादातून गांधीधाममधील हल्ला झाल्याचे वृत्त दिलं होतं. मात्र अशाप्रकारचा कोणताही हल्ला झाला नसल्याचे कच्छचे (पूर्व) पोलीस अधिक्षक मयुर पाटील यांनी यासंदर्भात एएनआयकशी संवाद साधताना संबंधित वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुकान मलकानेही हल्ला झाल्याचे वृत्त फेटाळलं असून धमकी देण्यात आल्याचं सांगितलं आहे.

गांधीधाममधील तनिष्कच्या शो रुममध्ये १२ ऑक्टोबर रोजी दोन लोकं आहे आणि त्यांनी गुजराती भाषेत माफी दुकानाबाहेर लावावी अशी मागणी केली. दुकानदाराने त्यांची मागणी पूर्ण केल्यानंतरही त्याला कच्छमधून धमकीचे फोन येत होते. दुकानावर हल्ला केल्याचे वृत्त खोटं आहे, असं मयुर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

गांधीधाममधील तनिष्क शो रुमचे व्यवस्थापक असणाऱ्या राहुल मनुजा यांनीही अशाप्रकारचा कोणताही हल्ला झाला नसल्याचे एएनआयशी बोलताना सांगितले आहे. “दुकानावर हल्ला झालेला नाही. मात्र धमकीचे फोन मात्र आलेले. पोलिसांनी आम्हाला सर्व सहकार्य केलं,” असं राहुल म्हणाले आहेत.

काय आहे वाद?

ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणाऱ्या सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी नवीन जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. टाटा ग्रुपच्या मालकीच्या तनिष्क या ब्रॅण्डची अशीच एक नवी जाहिरात सध्या वादात सापडली आहे. दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य या जाहिरातीमध्ये करण्यात आल्याने सोशल मीडियावर या जाहिरासंदर्भात अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. एक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामधील गोष्ट या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र हा लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq ची हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली.