X

शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार ICAN ला जाहीर

१० डिसेंबरला पुरस्काराचे होणार वितरण

संपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय अभियान International Campaign To Abolish Nuclear Weapons (ICAN) या संस्थेला यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्काराच्या स्वरुपात ICAN ला ११ लाख डॉलर इतकी रक्कम मिळणार आहेत.

नॉर्वेतील नोबेल समितीने सांगितले की, जगात अण्वस्त्रांच्या वापरामुळे होणाऱ्या विध्वंसाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याबद्दल ICAN ला हा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे. शांततेसाठीच्या या नोबेलसाठी पोप फ्रान्सिस, सौदीतील ब्लॉगर रैफ बदावी, ईरानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ हे देखील स्पर्धेत होते.

२००७ मध्ये सुरु झालेल्या ICAN या अभियानासाठी जगातील १०१ देशांमध्ये ४६८ सहयोगी संस्था काम करीत आहेत. या संस्थांचे सदस्य संपूर्ण जगातून अण्वस्त्रे नष्ट व्हावीत यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नोबेल पुरस्कार देणाऱ्या समितीच्या सदस्या बी. आर. अँडरसन यांनी म्हटले आहे की, आपण सध्या अशा जगात आहोत ज्यावर अणुयुद्धाचे सावट आहे. त्यामुळे जागतिक शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या ICAN संस्थेची निवड नोबेलसाठी करण्यात आली आहे.

जगभरात अण्वस्त्रांवर प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आणलेल्या प्रस्तावाला जुलै २०१२ मध्ये १२२ देशांनी सहमती दर्शवली होती. मात्र, या प्रस्वावापासून अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी स्वतःला वेगळे ठेवले. त्याचबरोबर इतर अनेक अण्वस्त्रधारक देशांनी देखील या प्रस्तावामध्ये रस दाखवला नव्हता.

First Published on: October 6, 2017 5:08 pm
Outbrain