काँग्रेसबरोबर आघाडी करण्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सध्या द्विधा मनस्थिती असल्याचे दिसून येते. भाजपाला पराभूत करण्यासाठी पक्षाला जे काही करायचे आहे, ते केले जाईल. मग त्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची गरज भासली तर ते ही करू, असे पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले आहे.

‘पीपल्स डेमॉक्रसी’ या पक्षाच्या मुखपत्रात करात यांनी संपादकीय लेखात याविषयी मत मांडले आहे. भाजपाला पराभूत केले जाऊ शकते हे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकातून स्पष्ट झाले आहे. जर सर्वच मोठे भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर छोट्या पक्षांचेही त्यांना समर्थन मिळेल, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

यापूर्वी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या प्रस्तावाला करात आणि केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह पक्षाच्या प्रभावी नेत्यांनी विरोध केला होता. पक्षाने वर्षाच्या सुरूवातीला एक अहवाल तयार केला होता. यामध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता फेटाळण्यात आली होती.

पक्षातील या गटाने आता नरमाईचे धोरण स्वीकारले असून विरोधी पक्षातील मतविभागणीचा भाजपाला फायदा होत असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर सर्वच राज्यातील भाजपा विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यावर जोर देण्याची आवश्यकता असल्याचे डाव्यांचे मत पुढे आले आहे. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये डाव्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिकडे पक्ष भाजपा विरोधी पक्षांची साथ घेऊ शकतो, असे या संपादकीयवरून वाटते.