पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आज (गुरूवार) अमेरिकेच्या राजदूतांना सुनावल्याचे वृत्त आहे. आम्हाला अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारणी आर्थिक मदत नको. पण वॉशिंग्टनने आमचा मान राखला पाहिजे, असे बाजवा यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने दहशतवाद्यांना आसरा न देण्याचा सल्ला दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजवा यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेचे राजदूत डेव्हिड हेव यांनी आज रावळपिंडी येथील पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयात बाजवा यांची भेट घेतली. त्यांनी अमेरिकेच्या नव्या अफगाणिस्तान आणि दक्षिण अशिया नितीविषयी माहिती दिली.

पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम विभागाने जारी केलेल्या निवदेनानुसार, आम्ही अमेरिकेकडून कोणत्याही सामुग्री किंवा आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाही. पण विश्वास, समज आणि आमचे योगदान अमेरिकेने स्वीकारले पाहिजे, असे बाजवा म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदण्यासाठी पाकिस्ताननेही महत्वाची भूमिका निभावल्याचे त्यांनी म्हटले.

अमेरिकेच्या राजदूतानेही पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधोत महत्वाची भूमिका पार पाडावी अशी इच्छा व्यक्त करत अफगाणिस्तानातील समस्येचे निराकरण करण्यासाठी पाकिस्ताननेही मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तत्पूर्वी अमेरिकेच्या राजदूताने विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांची भेट घेतली होती. या वेळी आसिफ यांनी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने दहशतवाद संपवण्यासाठी काम करेल अशी ग्वाही दिली.