देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचे काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्याशी संबंध आहेत. त्यांच्याच कृपेने हा घोटाळा झाला असल्याचा आरोप करीत भाजपने काँग्रेसवर पलटवार केला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी हा आरोप केला आहे.

सध्या देशभरात पीएनबी बँकेच्या घोटाळ्याचीच चर्चा आहे. चौकशीतून नीरव मोदीच्या कृत्यांची एकामागून एक प्रकरणे बाहेर येत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अद्याप एक शब्दही उच्चारलेला नाही, त्यामुळे काँग्रेसच्या हाती आयते कोलीत मिळाले असून त्यांनी या प्रकरणावरुन वारंवार भाजपला टार्गेट केले आहे. मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर देशातील जनतेचा जो पैसा बँकेत जमा झाला त्यानंतर बँकांनी नीरव मोदीला हा पैसा वाटला असा गंभीर आरोप शनिवारी राहुल गांधी यांनी केला होता. तसेच या प्रकरणी ज्यांनी बोलायला नको असा भाजपचा कोणताही मंत्री उठतोय आणि स्पष्टीकरण देतोय असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला होता.

या पार्श्वभूमीवर रविवारी राजधानी दिल्लीत भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माध्यमांशी बोलताना राम माधव यांनी काँग्रेसवर पलटवार केला. नीरव मोदीचे काँग्रेसच्याच जवळचा माणूस असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच यातील सत्य बाहेर येईल. मात्र, तेव्हा काँग्रेस नेत्यांना याचे उत्तर द्यावे लागेल असेही ते म्हणाले.

आज त्रिपुरात होत असलेल्या मतदानावरही यावेळी माधव यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान त्रिपुराच्या नागरिकांना घराबाहेर पडून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे येथील नागरिक पंतप्रधानांचे ऐकतील आणि भाजपला साथ देतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे, असे माधव म्हणाले.