छत्तीसगड जिल्ह््यात नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम चुकीच्या पद्धतीने व अकार्यक्षमपणे आखली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेवेळी सुरक्षा दलांचे २२ जवान मारले गेले, त्यावर गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे,की नक्षलवाद विरोधी मोहिमेची चुकीची व अकार्यक्षम आखणी यामुळे आमचे २२ जवान बळी गेले आहेत. आमचे जवान जर अशा पद्धतीने बळी जाणार असतील तर प्रत्येक भारतीय जवानाला चिलखती संरक्षण दिले पाहिजे.

शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण २२ सुरक्षा जवान ठार झाले होते. त्याबाबत राहुल गांधी म्हणाले,की आमचे सुरक्षा जवान स्वेच्छेने हुतात्मा होत नाहीत व ते तोफेच्या तोंडी बळी देण्यासाठी नाहीत. शनिवारच्या या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ, तर कोब्रा कमांडो दलाचे सात जण मारले गेले होते. गांधी यांनी पुढे म्हटले आहे,की एकविसाव्या शतकात कुणाही जवानाला चिलखती संरक्षणाशिवाय शत्रूशी लढण्यास पाठवणे चुकीचे आहे. प्रत्येक सैनिकाला चिलखती संरक्षणाची सुविधा दिली पाहिजे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी असे म्हटले होते,की यात गुप्तचर माहिती मिळवण्यात कुठल्याही चुका झाल्या नव्हत्या, शिवाय जितके जवान मारले गेले तितकेच नक्षलवादीही मारले गेले आहेत. त्यावर गांधी यांनी म्हटले आहे,की जर गुप्तचर संदेशात काहीच चुका नव्हत्या व एकास एक याप्रमाणात नक्षलवादी व जवान हे मारले गेले तर हे या सुरक्षा मोहिमेचे अपयशच आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षली हल्ल्यात ३० जवान जखमी झाले होते.