राफेल विमानांच्या करारांवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हा करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. एवढेच नाही तर मोदी सरकारने सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांचा अपमान केला आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांचाही या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सहभाग होता असाही आरोप राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात भारतीय कंपनीची निवड करण्यामध्ये आमची कोणतीही भूमिका नव्हती. करारासाठी कुठल्या भारतीय कंपनीला भागीदार म्हणून निवडायचे त्याचे पूर्ण स्वातंत्र्य फ्रेंच कंपनीला आहे असे फ्रान्स सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत सापडलेले असताना फ्रान्स सरकारने या करारातील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

हे स्पष्टीकरण आजच समोर आले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपा यांच्यात या करारावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या संदर्भात काही व्हिडिओ ट्विट करूनही भाजपाने काँग्रेसच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर त्या व्हिडिओजना प्रत्युत्तर देणारे व्हिडिओही काँग्रेसने पोस्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद दाराआड राफेल करारात बदल केला. एका उद्योगपतीला हे काम देण्यासाठी मोदींनी आग्रह धरला होता हे आम्हाला ओलांद यांच्यामुळेच समजलं असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.