माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न पुरस्कार आहे. नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  देशाच्या राजकारणातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याची नोंद घेऊन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार मोदी सरकारकडून देण्यात येतो आहे.

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार कुणाला द्यावा जाावा यासाठी पंतप्रधान नावांची शिफारस करत असतात. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावरही ते राष्ट्रपतीपदावर होते. दिल्लीच्या राजकारणातील अनेक गोष्टी मला प्रणवदांमुळे समजल्या असे पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे. तसेच मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमातही हजेरी लावली होती आणि तिथेही त्यांनी आपले स्पष्ट आणि परखड विचार मांडले होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव आता मोदी सरकारतर्फे करण्यात आला आहे.

दरम्यान ज्येष्ठ गायक भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. भुपेन हजारीका यांनी त्यांचे सगळे आयुष्य संगीत आणि गाण्यासाठी वेचले. एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती. भुपेन हजारीका हे त्यांची गाणी स्वतः लिहित आणि संगीतबद्ध करत. रुदाली या सिनेमातील दिल हूम हूम करे हे त्यांचे गाणे आजही लोकांच्या मनात रुंजी घालते आहे. हजारीका यांना याआधी पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आता त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्याचप्रमाणे नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी आयुष्य वेचले. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंघाची निर्मिती करण्यात नानाजी देशमुख यांचा मोठा वाटा होता. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी कार्य केले होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव आता सरकारतर्फे करण्यात आला आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. याआधी नानाजी देशमुख यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊनही गौरवले होते.