पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज (सोमवार)दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय काही कामगार अद्याप बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आले असून, यामध्ये काहीजण गंभीर जखमी झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या वारसांना व दुर्घटनेतील जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, या दुर्घटनेबाबत दुःख देखील व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रात पुण्यातील कारखान्यात लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे अंतःकरणाला वेदना होत आहेत. मृतांच्या कुटुंबांप्रती शोकभावना. असं पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे.

पुणे : केमिकल कंपनीत भीषण आग; १८ कामगारांचा होरपळून मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीस लागलेल्या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ‘पीएमएनआरएफ’मधून प्रत्येकी २ लाख रुपयांची, तसेच या दुर्घटनेतील जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून’ २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना ५० हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे.

पिरंगुट अग्नितांडव : मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर!

तर,“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.