पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

“१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदलाचे जवान यांना लसीकरण केले जाणार आहे. परंतू, या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

देशात लसीकरणासाठी जोरदार तयारी सुरु असून जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर ड्राय रनही भारतातच पार पडल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये त्यांनी लसीकरणाचा कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच याबाबत कुठली काळजी घेणं गरजेचं आहे याबाबतही सूचना दिल्या.