मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी खात्यापासून सुरुवात
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामकाजाचा हिशोब मागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपल्याच केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाचा हिशोब मागणार आहेत. येत्या २७ जानेवारीला होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक केंद्रीय मंत्री व राज्यमंत्र्यास सत्तास्थापनेपासून आतापर्यंत सुरू केलेल्या योजना, अंमलबजावणीची माहिती मोदींना द्यावी लागेल. याची सुरुवात कृषी खात्यापासून होणार आहे. आतापर्यंत आखलेले कृषी धोरण, शेती विकासासाठी घेतलेले निर्णय आदींची समीक्षा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांची ही रणनीती महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णय व योजनेवर काँग्रेसने सातत्याने टीका केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील योजनांची नावे बदलून भाजप नव्या योजना राबवत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सातत्याने करीत आहेत.
मंत्रिमंडळाच्या २७ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत कृषी विभागाच्या कामकाजावर चर्चा होईल. ज्यात प्रामुख्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, दुष्काळग्रस्त राज्यांना दिलेली मदत, कृषी मंत्र्यांचा देशभर दौरा..आदी विषयांवर मंत्रालयाकडून सादरीकरण केले जाईल. मंत्र्यांची प्रशासकीय क्षमता व विकास योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पंतप्रधान समीक्षा घेणार असल्याचा दावा सूत्रांनी केला. संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये विविध कारणांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदी मंत्र्यांच्या कामकाजाची समीक्षा करणार आहेत. ही समीक्षा अधिवेशन काळात पक्ष बैठकीत खासदारांसमोर मांडण्यात येईल. केलेल्या कामाचा प्रचार करण्याची रणनीती मोदी यांनी आखली आहे. सत्तास्थापनेच्या २० महिन्यांच्या काळात सरकारला घरवापसी, असहिष्णुता, दिल्ली व बिहारमधील पराभव तसेच हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या प्रकरणामुळे नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. त्या पाश्र्वभूमीवर मोदींकडून खातेनिहाय समीक्षा महत्त्वाची मानली जाते. २४ जानेवारी रोजी अमित शहा दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष होणार आहेत. त्यानंतर केंद्रात व पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आतापर्यंत केवळ एकदाच फेरबदल करण्यात आला होता. नव्या फेरबदलात उत्तर प्रदेशमधून तीन जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.