करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी भारतासह जगभरात लशीवर सध्या काम सुरु आहे. दरम्यान, भारताच्या लशीचं उत्पादन आणि लशीच्या वितरणाची क्षमता संपूर्ण मानवतेला संकटातून बाहेर काढण्याच्या कामी येईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत म्हटलं होतं. यावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असून सरकारची व्यवस्था भारतीयांच्या सर्व गरजांची काळजी घेईल हे स्पष्ट आहे, असं त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

अदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे म्हटलं, “जगाला लस पुरवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला आमचा पाठिंबा आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. तुमच्या नेतृत्वासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. हे स्पष्ट आहे की, भारतासाठी तुमची तयारी भारतीयांच्या सर्व गरजांची काळजी घेईल.”

पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीनं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेकासोबत करोनावर लस विकसीत करण्यात येत आहे. सीरम ही संस्था जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती करणाऱ्या संस्थांपैकी एक आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात जी लस विकसित केली जात आहे. त्या लसीच्या उत्पादनात या कंपनीची भागीदारी आहे.

दरम्यान, शनिवारी अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारला सवाल केला होता की, “सरकारजवळ पुढील एका वर्षात लोकांसाठी लशीवर खर्च करण्यासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत का?” आम्हाला लशीच्या खरेदी आणि वितरणाच्या संदर्भात आपल्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत आणि परदेशातील लस निर्मात्यांच्या मार्गदर्शनची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं.