युक्रेनमधून फुटून बाहेर पडण्यासाठी रशियावादी बंडखोरांनी पूर्व युक्रेनमध्ये सार्वमत घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने मात्र हे सार्वमत बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून पाश्चिमात्य देशांनी मात्र यात यादवी युद्धाचा धोका असल्याचे म्हटले आहे.
ज्या प्रांतात रशियन बंडखोरांचे वर्चस्व आहे अशा ठिकाणी काही शहरात हे सार्वमत घेतले जात असून त्यामुळे युक्रेनचा राजकीय पेचप्रसंग आणखी चिघळला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम संबंध बिघडले असून शीतयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे.  मतदारांनी होय असे मत दिले तर रशिया त्याला मान्यता देणार आहे, त्यामुळे येत्या दोन आठवडय़ात युक्रेनमध्ये होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुका हास्यास्पद ठरणार आहेत. युरोपीय समुदाय व अमेरिकेच्या मते या निवडणुका स्थिरतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत.
दरम्यान पूर्व युक्रेनमध्ये लढाई जोरात सुरू असून स्फोटांचे आवाज येत आहेत. स्लावयान्स्क येथून बंडखोरांना हुसकून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला.
सशस्त्र बंडखोरांशी  अनेक शहरात सैन्यदलांची धुमश्चक्री सुरू असून जिथे सार्वमत घेण्यात आले त्या डोनेस्क व ल्युगान्स्क भागातही  चकमकी झाल्या, युक्रेनच्या कायद्यानुसार सार्वमत घेणे बेकायदेशीर असून तो आणखी विभाजन करण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या  जेन साकी यांनी दिली.
अध्यक्षीय निवडणुका हाणून पाडल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा फ्रान्स व जर्मनीने दिला असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही रशियावर र्निबध लादले जातील व त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था मोडकळीस येईल असा इशारा दिला आहे.
अंतरिम पंतप्रधान ओलेकसाद्र टर्शीनोव यांनी सांगितले की, त्या भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस येईल. बंडखोरांनी त्या दोन राज्यांतील ७० लाख लोकांपैकी ९० टक्के लोकांनी सार्वमतात भाग घेतल्याचा दावा केला आहे.