दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी हजेरीच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी आहे त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा जेएनयूकडून देण्यात आला. त्यानंतर जेएनयूचे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या सगळ्याचे मूळ प्राध्यापक अतुल जोहरी यांच्यासोबत झालेल्या वादात आहे.

अतुल जोहरी हे जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत त्यांनी काही मुलींना अश्लील इशारे केले तसेच अश्लील शेरेबाजी केली असा आरोप करत या विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वीच वसंतकुंज पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करत त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली. ९ मुलींनी प्राध्यापक अतुल जोहरी यांच्याविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र जोहरी यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दिला, या अर्जानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

वर्गात हजेरी कमी असल्याने मी विद्यार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला ज्यानंतर माझ्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचे आणि अश्लील चाळे केल्याचे आरोप करण्यात आले. या सगळ्या प्रकरणात मला नाहक गोवले जाते आहे असाही आऱोप जोहरी यांनी केला. मात्र जोहरी यांची सुटका झाल्याने विद्यार्थी आणखी आक्रमक झाले. इतकेच नाही तर हा वर्गातील हजेरीचा मुद्दा आता थेट रस्त्यावरच पोहचला आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

विद्यार्थ्यांचे हे आंदोलन इतके चिघळले की त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला. वसंतकुंज पोलीस ठाण्यासमोर जेव्हा अशाच प्रकारे विद्यार्थी अडून बसले होते तेव्हाही पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला होता. जेएनयूतील हजेरीच्या मुद्द्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. दिल्लीत संसदेसमोर जाऊन या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.