करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं पावसाळी अधिवेशन वेळेआधीच संपवण्यात आलं. १४ सप्टेंबर रोजी सुरु झालेलं हे अधिवेशन १८ दिवस म्हणजेच १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं. मात्र, दहा दिवसांतच हे अधिवेशन गुंडाळण्यात आलं. गेल्या काही दिवसांत काही मंत्र्यांसह खासदारही करोना पॉझिटिव्ह आढळले होते. या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहात उपस्थित होते.

१४ सप्टेंबर रोजी सुरु झालेल्या या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात अनेक विधेयकं मंजूर करण्यात आली. यामध्ये नुकतेच काढण्यात आलेल्या अध्यादेशांचं कायद्यात रुपांतर करण्यासाठीच्या विधेयकांचाही समावेश होता. राज्यसभेत २५ विधेयकांना मंजुरी मिळाली. तर गोंधळाच्या स्थितीमुळं विरोधीपक्षांच्या आठ सदस्यांना रविवारी शेवटच्या सत्रासाठी निलंबित करण्यात आलं.

दरम्यान, लोकसभेत चांगल्या प्रकारे कामकाज पार पडलं. १० दिवसांत लोकसभेत २५ विधेयकं मंजूर झाली तर १६७ टक्के कामकाज झालं. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला म्हणाले, “करोना महामारीदरम्यान पार पडलेलं हे पावसाळी अधिवेशनात अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरलं. कारण सरकारच्या दृष्टीने अनेक महत्वाची विधेयक यावेळी मंजुर झाली.”