उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे हा २०१४ साली भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा होता. आपण त्यापासून पळ कसा काय काढू शकतो? आपल्याला हे आश्वासन पूर्ण केलेच पाहिजे, असे सांगत राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. ते बुधवारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिरासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे सांगितले. राम मंदिर बळजबरीने बांधावे असे माझे म्हणणे नाही. मात्र, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊन प्रयत्न केले पाहिजेत. न्यायालयाने यासंदर्भातील म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि हा मुद्दा निकाली काढला पाहिजे, असे मत सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. त्यामुळे भाजप नेतृत्त्वाकडून यासंदर्भात काय भूमिका घेण्यात येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राजीव गांधींनी राम मंदिर बांधले असते – सुब्रमण्यम स्वामी
भाजपने उत्तर प्रदेशात रामायण संग्रहालय उभारण्याच्या केलेल्या घोषणेवरून कालच भाजप खासदार विनय कटीयार यांनी पक्षश्रेष्ठींवर टीकेचा बाण सोडला होता. रामायण संग्रहालयाची घोषणा हे फक्त लॉलीपॉप आहे. पण आता असे लॉलिपॉप नको तर प्रत्यक्षात राममंदिर हवे, असे कटियार यांनी ठणकावून सांगितले होते. मी जेव्हापण अयोध्येत जातो, संतमंडळी मला रामंदिर कधी बांधणार असे विचारतात. आज मी तिथे गेलो नाही हे सुदैवच आहे’, अशी खंतही कटियार यांनी व्यक्त केली होती. अयोध्येतील रामजन्मभूमीपासून १५ किलोमीटर अंतरावर रामायण संग्रहालय बांधण्याची घोषणा भाजपने केली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी या प्रस्तावित संग्रहालयाच्या जागेची मंगळवारी पाहणी केली होती.
भाजपने कारसेवकांची माफी मागायला हवी- शिवसेना