स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) नऊ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशातून फरार झालेला उद्योगपती मद्य सम्राट विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होतोय याची आपल्याकडे माहिती नाही, असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं कोर्टात दिलं आहे.

सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होत आहे, याचं कारण विचारलं. त्यावर “फरार मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश युकेच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. ब्रिटनमध्ये या प्रकरणावर नक्की काय गुप्त कार्यवाही सुरु आहे ज्यामुळे प्रत्यार्पणाला उशीर होत आहे, याची आपल्याकडे माहिती नाही, असं उत्तर केंद्र सरकारनं कोर्टाला दिलं.

दरम्यान, कोर्टाने विजय मल्ल्याच्या वकिलांना विचारलं की, त्यांनी दोन नोव्हेंबरपर्यंत सांगाव की मल्ल्या केव्हा कोर्टासमोर हजर राहू शकतो. तसेच त्याच्याबाबत सुरु असलेली गोपनीय कार्यवाही कधी संपेल.