भारतात करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५० टक्के झाला आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. राज्यांमधील करोनाची स्थिती मला जाणून घ्यायची आहे. तसंच राज्यांमधली परिस्थिती काय आहे? त्याबाबत मला तुम्हा सगळ्यांचे सल्ले हवेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसंच त्यामुळेच पुढची रणनीती ठरवण्यात येईल असंही मोदी यांनी स्पष्ट केलं. करोनामुळे जे काही मृत्यू झालेत ती दुःखद बाब आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

आपण करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जेवढे यशस्वी होऊ तेवढीच आपली अर्थव्यवस्थाही सुधारेल. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाल्यास सरकारी कार्यालयं, खासगी कार्यालं, मार्केट उघडू शकतील. दळणवळणाची साधनं सुरु होतील आणि तेवढ्याच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असंही मोदींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “…त्यातून रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील”; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

जगभरात भारताने करोना काळात दाखवलेल्या संयमाची, शिस्तीची चर्चा होते आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर जगभरातले लोक भारतातल्या शिस्तीची चर्चा करत आहेत. आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा मास्क लावणं, सॅनेटायझर लावणं, बाहेरून घरात आल्यानंतर हात-पाय धुणे, हँडवॉशचा वापर करणं या सगळ्या गोष्टी पाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला. एवढंच नाही तर करोनाचा प्रादुर्भाव जेवढा कमी करण्यात आपण यशस्वी होऊ तशी आपल्या अर्थव्यवस्थेची वाट सुकर होईल असंही मोदींनी म्हटलं आहे.