आपण खातो त्या अन्नात अनेक अपायकारक व उपकारक घटकही असतात ते ओळखणारा स्कॅनर संशोधकांनी विकसित केला असून, तो सहज वापरता येणारा तर आहेच, पण स्मार्टफोनलाही तो जोडता येतो. आपण जे अन्न खातो त्यात अ‍ॅलरजेन, रसायने, पोषके व उष्मांक असे अनेक घटक असतात. या स्कॅनरच्या मदतीने ते नेमके कोणते आहेत हे समजते. टेलस्पेक असे या स्कॅनरचे नाव असून तो टोरांटो येथे तयार करण्यात आला आहे, हा स्कॅनर तुम्ही तुमच्या अन्नपदार्थावर धरल्यानंतर तुम्ही त्यातील सर्व घटक ओळखू शकतो.
विशेष करून ज्यांना आपल्या प्रकृतीची काळजी आहे, ज्यांना लठ्ठपणा टाळण्यासाठी अन्नपदार्थातील उष्मांक जाणून घेणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी हे वापरण्यास सोपे असे उपकरण आहे. यात तुम्ही निवडलेल्या अन्नघटकातील शर्करा, मेद व इतर सर्व घटकांचे ग्रॅममागे असणारे प्रमाण या स्कॅनरच्या मदतीने सांगता येते. त्यामुळे लोकांना स्वच्छ व आरोग्यकारक अन्नपदार्थ ओळखणे सोपे होईल. आपण जसे मेल चेक करतो तितक्या सोपेपणाने अन्नपदार्थातील घटक ओळखता येतील. या स्कॅनरमध्ये छोटासा रामन स्पेक्ट्रोमीटर बसवलेला असून तो वेगळय़ा क्लाउड आधारित अलगॉरिथमवर आधारित आहे. त्यात एक साधे स्मार्टफोन अ‍ॅपही वापरलेले आहे. अन्नघटकांचे स्कॅनिंग हे अन्नपदार्थ तुमच्या ताटाच असताना किंवा तुम्ही अन्नपदार्थाचे शॉपिंग करीत असताना करता येईल, त्यासाठी हा स्कॅनर अन्नपदार्थाच्या दिशेने धरायचा व एक बटन दाबायचे. त्यानंतर कमी ऊर्जेचे किरण त्यातून बाहेर पडतात व ते अन्नपदार्थावर आपटून परत येतात, त्यावरून तुमच्या अन्नाची रासायनिक घडण समजते. ही माहिती विश्लेषण इंजिनाला पुरवल्यानंतर त्याचे पृथक्करण होते. नंतर त्याची तुलना त्यात अगोदरच असलेल्या वर्णपंक्तीशी करून डाटाबेसच्या मदतीने निष्कर्ष दाखवले जातात. नंतर ते स्मार्टफोनवर डाऊनलोड करता येतात असे ‘गिझमॅग’ या नियतकालिकाने म्हटले आहे. अन्नपदार्थाचा पृष्ठभाग स्कॅन केल्यानंतर त्यातील घटक ९७.७ टक्के ओळखले जातात. यात किमान तीन हजार अन्नपदार्थाचे स्कॅनिंग करून त्याचा डाटाबेस तयार केला आहे, त्याच्याशी हे घटक ताडून पाहिले जातात, असे टोरांटोच्या ज्या कंपनीने हा स्कॅनर तयार केला त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी इसाबेल हॉफमन व गणितज्ज्ञ स्टीफन वॉटसन यांनी सांगितले. जेवढे हे उपकरण जास्त वापरले जाईल तेवढे जास्त अन्नपदार्थ ओळखण्याची क्षमता त्यात आणता येईल. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये हा स्कॅनर विक्रीस उपलब्ध होत आहे.