भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच दहा रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने १०० कोटी रुपये किंमत असणाऱ्या दहा रुपयांच्या नोटा छापून त्या चलनात आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या नोटा चॉकलेट ब्राऊन म्हणजेच आत्ताच्या दहा रुपयांच्या नोटांपेक्षा थोड्या गडद रंगाच्या असतील. विशेष म्हणजे या नोटांच्या मागील बाजूवर ओडीशा येथील पूरीमधील जगप्रसिद्ध कोणार्क सुर्यमंदीराचे चित्र असणार आहे. समोरील बाजूस महात्मा गांधीचे चित्र असणाऱ्या सिरीजमधीच ही नोट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवीन नोटांच्या डिझाइनला सरकारकडून मागील आठवड्यामध्ये होकार मिळाल्यानंतर आठवड्याभरात रिझर्व्ह बँकेने १०० कोटी रुपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. याआधी २००५ साली दहा रुपयांच्या नोटांच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये २०० रुपयांच्या आणि ५० रुपयांच्या नवीन नोटा आरबीआयने चलनात आणल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये आरबीआय पुन्हा या नव्या दहा रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे. कमीत कमी मुल्यांच्या नोटा अर्थव्यवस्थेत राहण्याच्या उद्देशाने सरकार प्रयत्न करत असून नोटाबंदीनंतर सरकारने हजार रुपयांची नोट चलनातून हद्दपार केली आहे. याच कमी मुल्यांच्या जास्तीत जास्त नोटा चलनात ठेवण्याच्या हेतूनेच सरकारने या नवीन दहा रुपयांच्या नोटा छापल्याचे समजते.

याबद्दल बोलताना स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपचे मुख्य आर्थिक सल्लागार असणारे सौम्या कांती घोष म्हणतात की, ‘दैनंदिन व्यवहारामध्ये छोट्या मुल्यांच्या नोटांचा वापर वाढावा आणि मोठ्या किंमतीच्या खरेदीसाठी लोकांनी डिजीटल माध्यमाचा वापर करावा या हेतून छोट्या मुल्याच्या नोटा चलनात आणण्याचे प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.’

देशातील रोखीच्या व्यवहरांवरील मुख्य नियंत्रक असणाऱ्या आरबीआयने ८ नोव्हेंबर २०१६नंतरच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर छोट्या मुल्यांच्या १२०० कोटींच्या नोटा चलनात आणल्या आहेत. यात प्रमुख्याने दहा, वीस आणि पन्नास रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नोटांची संख्या ११.१० टक्क्यांनी वाढल्याचे आरबीआयच्या २०१६-१७ च्या आर्थिक अहवालामध्ये नमूद केले आहे. नोटबंदीनंतर छोट्या मुल्यांच्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या ही वाढ झाल्याचे यात म्हटले आहे. दरम्यान नोटबंदीनंतर अद्यापही आरबीआयकडून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांची पूर्ण मोजणी झालेली नाही.