देशात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या करोनाच्या भयावह स्थितीमुळे विविध राज्यांत लॉकडाउन आणि कठोर निर्बंध लागले आहेत. त्यामुळे रोजगार आणि उद्योग धंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात महाराष्ट्राने २२,०१२ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा (जीएसटी) कर केंद्राकडे जमा केला आहे.

महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही प्रमाणात लॉकडाउन लावण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्राला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे काही प्रमाणात उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र तरीही महाराष्ट्राने एप्रिल महिन्याच २२,०१२ कोटी रुपयांचा जीएसटी केंद्र सरकराकडे जमा केला आहे. २०१७ साली जीएसटी लागू झाल्यानंतर एकाच महिन्यात सर्वाधिक जास्त कर हा महाराष्ट्राने एप्रिल महिन्यात जमा केला आहे. एप्रिल २०२१ मध्ये जमा करण्यात आलेला जीएसटी हा गेल्या वर्षीच्या एप्रिलपेक्षा ३८० टक्क्यांनी जास्त आहे. यावर्षीदेखील मार्चच्या तुलनेत जमा करण्यात आलेला जीएसटी हा २९ टक्क्यांनी जास्त आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीला जमा होणारा जीएसटी हा मार्चच्या तुलनेने अधिक असतो. महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम हा मे महिन्याचा जीएसटीवर दिसून येणार आहे. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने कंपन्यां स्टॉक क्लिअरन्सचे काम हाती घेत असतात त्यामुळे सामान्यतः एप्रिलमध्ये जीएसटीच्या अधिक महसूल जमा झालेला दिसतो.

एप्रिल २०१८ मध्ये १६,७२७, एप्रिल २०१९ मध्ये १८,१२३ इतका जीएसटी जमा करण्यात आला होता. त्यामुळे एप्रिल २०२१ जमा होणारा जीएसटी हा अपेक्षितच होता असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्राकडे जमा करण्यात येणाऱ्या जीएसटीमध्ये दरवर्षी २ हजार कोटींची वाढ होत असते. गेल्या वर्षी देशभरात लावलेल्या लॉकडाउनमुळे अपेक्षित महसूल जमा झाला नाही. जीएसटी हा राज्य सरकारला महसूल मिळवून देणारा मुख्य स्त्रोत आहे. महाराष्ट्रातून केंद्राकडे जमा करण्यात येणारा जीएसटी हा देशात सर्वाधिक आहे.

दरम्यान, देशात एप्रिल महिन्यातील जीएसटी वसुली मार्च महिन्यातील १.२३ लाख कोटींपेक्षा १४ टक्के अधिक आहे. एप्रिल महिन्यात एक लाख ४१ हजार ३८४ लाख कोटींचा जीएसटी प्राप्त झाला.  त्यामध्ये केंद्राचा २७ हजार ८३७ कोटी, राज्याचा ३५ हजार ६२१ कोटी, एकीकृत जीएसटी ६८ हजार ४८१ कोटी, उपकर ९४४५ कोटींचा समावेश आहे.