देशातील राजधानीत देशाच्या गौरवाच्या दिनी घडलेला हिंसाचाराचा शिवसेना निषेध करते. दिल्लीतील वातावरण बिघडलं याला अहंकारी सरकारच जबाबदार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राऊत म्हणाले, “दिल्लीत जे आज झालं त्याला मी राष्ट्रीय स्तरावरील लाजिरवाणी गोष्ट मानतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज संपूर्ण जग देशाचं सामर्थ पाहत असताना दुपारनंतर संपूर्ण जगाने दिल्लीच्या रस्त्यांवर जे दृश्य पाहिलं. हे आंदोलकांना शोभा देत नाही किंवा सरकारलाही शोभत नाही.”

आणखी वाचा- दिल्ली ट्रॅक्टर परेड हिंसाचार : ८३ पोलीस कर्मचारी जखमी; चार गुन्हे दाखल

“दोन महिन्यांपासून खूपच संयमाने आणि शांततेत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. संपूर्ण जगात मी याबाबत ऐकत होतो. त्यात इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कधीही झालं नसल्याचं म्हटलं जात होतं. मग आज अचानक शेतकऱ्यांचा बांध फुटला. ही आराजकता का घडली, सरकार काय करत होतं. सरकारच याच गोष्टीची वाट पाहत होतं का? असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला.

आणखी वाचा- ट्रॅक्टर मोर्चा : दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा करणारे घुसखोर होते; ४० शेतकरी संघटनांचा दावा

लाल किल्ल्यावर जे काही झालं त्याचा शिवसेना निषेध करते. आज शेतकरी आंदोलनाला डाग लागला. याची सरकारनं जबाबदारी घ्यावी. ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचे नेते आता कोणाचा राजीनामा मागणार? शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरेंचा की जो बायडन यांचा असा खोचक सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला.

दिल्लीतील घटनेमुळे संपूर्ण देशातील वातावरण बिघडू शकतं. त्यामुळे सरकारला आवाहन आहे की त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणावी. एका वर्षापूर्वी जे शाहीन बागबाबत झालं होतं ते आज शेतकऱ्यांबाबत झालं आहे. यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आहे. लाखो शेतकऱ्यांचं जर आपण ऐकत नसाल तर ही लोकशाही आहे का? बाबरी पाडली हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं तसंच आत्ताचंही गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे, असा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला.