*  दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन ठरला
*  ४ जूनला सुटका होणार; सरकार उच्च न्यायालयात आव्हान देणार

संपूर्ण देशभर खळबळ माजविलेल्या आणि तरुणाईची शक्ती संघटित करून राज्यकर्त्यांना खडबडून जाग आणणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कारात त्या तरुणीला लोखंडी सळीने विकृत पद्धतीने घायाळ करणारा क्रूरकर्मा १८ वर्षे पूर्ण व्हायला अवघे पाच महिने आणि सहा दिवस कमी पडत असल्याने ‘अजाण’ ठरला असून त्यामुळे या ४ जूनला तो उजळ माथ्याने तुरुंगाबाहेर पडणार असल्याची धक्कादायक बाब सोमवारी स्पष्ट झाली आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.
दिल्लीत १६ डिसेंबरच्या रात्री धावत्या बसमध्ये निमवैद्यकीय शाखेतील २३ वर्षीय तरुणीवर सहा नराधमांनी पाशवी बलात्कार केला. यावेळी तिला तसेच तिच्या मित्राला लोखंडी सळ्यांनी मारहाणही करण्यात आली आणि नंतर या दोघांना रस्त्यावर रक्तबंबाळ व विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले. २९ डिसेंबरला तिचे सिंगापूरमध्ये निधन झाल्याने सरकारवर दबाव वाढला.
या सहाही नराधमांना फाशीच द्यावी, अशी मागणी जोर धरत असताना या गुन्ह्य़ात क्रौर्याचा विकृत कळस गाठणारा सहावा आरोपी या घडीला १८ वर्षांचा नाही, तो १७ वर्षे ६ महिने आणि २४ दिवसांचा असल्याने तो अल्पवयीन आहे, असा निर्वाळा बालन्यायालयाने त्यांना सादर करण्यात आलेल्या त्याच्या जन्मतारखेच्या व शालेय कागदपत्रांच्या नोंदीवरून दिल्याने या ४ जूनला त्याची सुटका अटळ झाली आहे. हा मुलगा ज्या शाळेत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनीही आपल्या या विद्यार्थ्यांचे वय साडेसतरा असल्याचा निर्वाळा दिला. उत्तर प्रदेशातील बदायूँ येथील भवानीपूरमधील शाळेत हा मुलगा तिसरीपर्यंत शिकत होता. या शाळेच्या सध्याच्या व माजी मुख्याध्यापकांची साक्ष झाली.
या मुलाला आपण ओळखत नाही मात्र त्याने २००२ मध्ये शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी त्याच्या पालकांनी त्याची जन्मतारीख ४ जून १९९५ असल्याचे सांगितले होते, असे या मुख्याध्यापकांनी सांगितले. अर्थात वडिलांनी सांगितलेली तारीखच नोंदली गेल्याचे स्पष्ट आहे.
विशेष म्हणजे या दाखल्यांना आक्षेप घेत या मुलाचे वय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचणी घेण्याची पोलिसांची मागणीही बालन्यायालयाने तत्परतेने फेटाळली आहे.

काय सांगतो कायदा?
दंडसंहितेच्या १५ (ग) या कलमानुसार १६ ते १८ या वयोगटातील मुलाने कोणताही गुन्हा केल्यास व तो दोषी सिद्ध झाल्यास त्याला बालसुधारगृहात जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत बंदी म्हणून ठेवले जाऊ शकते. त्यानंतर योग्य वर्तनाच्या हमीवर त्याला सोडावे लागते. मात्र कलम १६ प्रमाणे वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंतच अशा मुलाला बालसुधारगृहात ठेवता येते त्यानंतर त्याची सुटका करावीच लागते. त्याचाच फायदा या ‘अजाण’ मुलाला या गुन्ह्य़ात होणार आहे.