News Flash

ऊनामधील दलितांना मारहाण ही ‘छोटी घटना’: रामविलास पासवान

पासवान यांचे हे वक्तव्य म्हणजे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

रामविलास पासवान

गुजरातमधील ऊना येथे चार दलितांना झालेली अमानुष मारहाण ही एक छोटी घटना होती, असे वक्तव्य करून लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी नवा वाद निर्माण केला आहे. या वक्तव्यामुळे पासवान यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीनिमित्त अहमदाबाद येथील दनीलिम्दा या राखीव मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नेहमी छोट्या-मोठ्या घटना होत असतात. आमच्या बिहारमध्ये नेहमी अशा घटना घडतात. गुजरातमधील ऊना येथेही अशीच एक छोटी घटना घडली होती. त्यावर मोठा गोंधळ उडाला होता. पण सरकारचं काम हे अशा घटनांविरोधात पाऊल उचलणे हे असते. अशा घटनांविरोधात कशा प्रकारे पाऊल उचलले जाते हे खूप महत्वाचे आहे.

गेल्यावर्षी गुजरातमध्ये मृत गायीचे कातडे काढण्यावरून चार दलितांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्याविरोधात दलितांनी गुजरातमधील सरकारी कार्यालयांसमोर मृत गायी आणून ठेवल्या होत्या. गुजरातसह देशभरात या घटनेच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती. दरम्यान, पासवान यांच्या वक्तव्याचा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संयोजक जिग्नेश मेवानी यांनी निषेध करत ही लज्जास्पद गोष्ट असून पासवान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

पासवान यांचे हे वक्तव्य म्हणजे पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. या लोकांना बेदम मारहाण करून अर्धनग्न अवस्थेत फिरवण्यात आले होते. ही खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे. या घटनेच्या विरोधात सुमारे ३० दलितांनी विष प्राशन केले होते. रस्ते, रेल्वे रोको करून तीव्र आंदोलन केले होते. आम्ही पासवान यांच्या या वक्तव्याचा निषेध करून राजीनाम्याची मागणी करतो, असे मेवानी यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:43 pm

Web Title: the small incident that killed dalits in una says ram vilas paswan
Next Stories
1 राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा – सायना नेहवाल, सिंधूमध्ये अंतिम लढत
2 उणे २२ डिग्री तापमानात अॅक्शन सीन करताहेत सलमान-कतरिना
3 एकाच सामन्यात दोन कर्णधार, पाहा काय म्हणताहेत नेटिझन्स
Just Now!
X