राज्यात मराठा समाजाकडून लाखोंचे मोर्चे निघाले. या मोर्चांदरम्यान कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. हे मोर्चे जरी शांततेमध्ये निघाले असली तरी त्याचा आवाज हजारोपटीने मोठा होता त्यामुळे त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला असून मराठा आरक्षणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात दिली.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतरे आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मराठा समाजाने राज्याच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिले असून या समाजात आजवर एखादा घटक श्रीमंत आणि दुसरा घटक गरीब असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यासाठी मराठा समाजाने मोर्चे काढले, या मोर्चांची सरकारने दखल घेतली असून सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच त्यातून न्यायालयात अहवाल देऊन योग्य तो निर्णय होईल आणि त्यानंतर आरक्षण मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर हे सरकार काम करीत आहे. या पुढील काळात हे सरकार समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन काम करणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर दिसेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सरकारची योजना आहे. आरक्षण आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच पण त्यासोबत सरकारने सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.