आगामी २०१९च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील उपस्थित होते.
AP CM N Chandrababu Naidu has taken the lead and met several leaders to consolidate all secular parties to remove NDA govt in 2019. He met me & HD Kumaraswamy today to work out further strategy: JDS leader & Former PM Deve Gowda pic.twitter.com/ujOUK0f7L2
— ANI (@ANI) November 8, 2018
भेटीनंतर देवेगौडा म्हणाले, मोदी सरकारच्या काळात संविधानिक संस्थांना धोका निर्माण झाला आहे. याविरोधात सर्व धर्मनिरपेक्ष नेत्यांनी एकत्र यायला हवे. काँग्रेस भलेही १७ राज्यांमध्ये भाजापकडून हरली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिल. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी सुरु केलेल्या विरोधकांच्या एकजुटीच्या मोहिमेला काँग्रेसने मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये जेडीएस आणि काँग्रेस युतीने मोठा विजय मिळवल्यानंतर गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी जनता दल युनायटेडचे सर्वोसर्वा एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. दरम्यान, नायडू यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू माध्यमांशी बोलताना म्हणाले, आपल्याला या देशाला इथल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. सीबीआय अडचणीत आहे. आरबीआयवर देखील हल्ला होत आहे. ईडी, इन्कम टॅक्स विभाग यांचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या ठिकाणी विरोधकांविरोधात या संस्थांचा वापर केला जात आहे. राफेलवर पंतप्रधान मोदी काहीही बोलण्यास तयार नाहीत. दोन वर्षानंतरही अद्याप नोटाबंदीचे फायदे दिसून आलेले नाहीत. इंधनाचे भाव वाढतच आहेत. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली असून महागाईतही वाढ झाली आहे. देशातील अल्पसंख्यांकांवरही दबाव असून संविधानही धोक्यात आले आहे.
टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी काँग्रेस प्रमुख राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वोसर्व शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ते आता द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.
First Published on November 8, 2018 7:27 pm