अंडरवर्ल्ड डॉन आणि कुख्यात गुंड, दाऊद इब्राहिमच्या काळ्या साम्राज्याला सुरुंग लावणारी एक बातमी समोर आली आहे. दाऊदचा ‘राईट हँड’ अशी ओळख असलेला छोटा शकील त्याच्यापासून वेगळा झाला आहे. या दोघांमध्ये फूट पडल्याची बातमी समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दाऊद १९८० च्या सुमारास मुंबई सोडून पळाला. तेव्हापासून तो कधी दुबई तर कधी कराचीत वास्तव्य करत आला आहे. मात्र IB च्या एका अधिकाऱ्याने दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याची माहिती दिल्याचे समजते आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदचा छोटा भाऊ अनिस हा गँगच्या कारभारात लक्ष घालू लागला. जे छोटा शकीलला खटकले. यावरून दाऊद आणि छोटा शकील यांच्यात चांगलाच वाद रंगला. या वादानंतरच दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याची माहिती समोर येते आहे. छोटा शकील हा दाऊदच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहे. जवळपास तीस वर्षे दाऊदसोबत तो काम करतो आहे. मात्र दाऊदच्या भावाने गँगमध्ये केलेला हस्तक्षेप शकीलला मान्य नाही, त्याचमुळे तो दाऊदपासून वेगळा झाला आहे असे समजते आहे.

दाऊदचा भाऊ अनिस पाकिस्तानात दाऊदसोबतच राहतो. गँगच्या कारभारात त्याने पहिल्यांदाच लक्ष घातले. ज्यानंतर दाऊद आणि छोटा शकीलची एक बैठक झाली. या बैठकीत अनिसवरून या दोघांमध्ये वाद झाला आणि तिथेच या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर शकील वेगळा झाला असून त्याने पूर्व आशियाई देशांमध्ये त्याच्या खास माणसांची भेट घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

इंटॅलिजन्स ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याची बातमी आल्याने पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या आहेत. मुंबई, दुबई आणि पाकिस्तान या ठिकाणी डी गँगच्या काही मोजक्या लोकांनाच दाऊद आणि छोटा शकील यांच्यात झालेल्या वादाची माहिती आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. तसेच छोटा शकीलही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. डी गँगपासून छोटा शकीलने फारकत घेतल्यामुळे आता एकाच गँगच्या दोन टोळ्या आणि त्यातील नवा वाद समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.