आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ या पुस्तकातून भारत-पाकिस्तान संबंधाबाबत महत्वाचे खुलासे करताना काही गोष्टींची कबुली सुद्धा दिली आहे. १९६५ आणि १९७१ या दोन युद्धात भारताकडून झालेला पराभव हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे सर्वात मोठे अपयश असल्याचे दुर्रानी यांनी म्हटले आहे.

१९६५ च्या युद्धात आमच्याकडे भारताबद्दल बऱ्यापैकी माहिती होती. युद्धासाठी भारतीय सैन्य कशा प्रकारे जमा होत आहे याची आम्हाला माहिती होती. पण शेवटी त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर १९७१ च्या युद्धात भारत पूर्व पाकिस्तानवर हल्ला चढवेल असे वाटले नव्हते. आम्ही त्यावेळी कमी पडलो अशी स्पष्ट कबुली दुर्रानी यांनी पुस्तकात दिली आहे.

माझ्या कार्यकाळात काश्मीरमध्ये उठाव झाल्यानंतर भारताने लष्करी सिद्धता वाढवण्यावर भर दिला पण ती सिद्धता युद्धासाठी नव्हती हा माझा अंदाज बरोबर होता. त्यासाठी मी स्वत:ची पाठ थोपटून घेतो. पण ही परिस्थिती किती काळ चालू राहिल त्याचा अंदाज बांधण्यात आम्ही अपयशी ठरलो असे दुर्रानी यांनी लिहिले आहे. मोहम्मद असद दुर्रानी, रॉ चे माजी प्रमुख ए एस दुलत आणि पत्रकार आदित्य सिन्हा या तिघांनी मिळून ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ हे पुस्तक लिहीले आहे.

हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात बंद असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांची सुटका होऊ शकते असे मत आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी व्यक्त केले आहे.  एका टप्प्यावर पाकिस्तान कुलभूषण जाधव यांची सुटका करु शकतो असे त्यांनी म्हटले आहे.