भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याचा मद्य व्यापारी विजय मल्ल्याचा दावा अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी विजय मल्ल्यांवर टीकास्त्र सोडले आहे. भारत सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, हे विजय मल्ल्याचे वक्तव्य तथ्यात्मकरित्या पूर्णपणे खोटे आहे. २०१४ पासून आतापर्यंत मी मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

आपल्या ब्लॉगमध्ये जेटली म्हणाले की, ते जेव्हा राज्यसभा सदस्य होते. तेव्हा ते अपवादत्मकरित्याच संसदेत येत. ते एकदा संसदेच्या कामकाजावेळी अनौपचारिकत्या माझ्या खोलीकडे आले होते. त्यावेळी त्यांनी मी तडजोडीसाठी एक प्रस्ताव तयार करत असल्याचे सांगितले. हे बोलणे पुढे नेण्यापूर्वी मी त्यांना त्यांच्या यापूर्वीच्या प्रस्तावाबाबत आठवण करून दिले. मी मल्ल्यांना म्हणालो, माझ्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी हे आपल्या बँकांसमोर ठेवले पाहिजे. इतकेच काय त्यावेळी त्यांनी जी कागदपत्रे आणली होती. तीही मी घेतली नाहीत.

मल्ल्या यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा गैरफायदा घेत माझी भेट घेतली होती. याप्रकरणी मी त्यांना वेळ देण्याचा प्रश्नच नव्हता, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, असा दावा मल्ल्याने केला होता. तडजोडीसाठी मी जेटलींची भेट घेतली होती. बँकांनी माझ्या तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते.