उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सात प्रश्न उपस्थित केले असून, केंद्राकडून त्याचे उत्तर मागितले आहे. तूर्ततरी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट सुरूच राहणार असून, २९ एप्रिलला बहुमत सिद्ध करण्याचा उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या प्रकरणी पुढील सुनावणी ३ मे रोजी होईल, असे न्यायालयाने सांगितले.
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी, २२ एप्रिलला २७ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात न्या. दीपक मिश्रा व न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. विधानसभेचे अध्यक्ष हेच सभागृहाचे प्रमुख असतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर या प्रकरणाशी राज्याच्या मुख्य सचिवांना काहीही संबंध नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.