अर्थव्यस्थेत सध्या सुस्तीचे वातावरण असताना शुक्रवारी शेअर बाजारातही मोठी घसरण पहायला मिळाली. बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक ३०७ अंकांनी कोसळला. त्याचबरोबर, डॉलरच्या तुलनेत रुपयाचेही मूल्य घटले असून आज एका डॉलरची किंमत ७२.०३ रुपये इतकी झाली आहे.

गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक ५८० अंकांनी पडून बंद झाला होता, त्यामुळे आज कशा पद्धतीने शेअर बाजार उघडतो याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, आज बाजार सुरु होताच सेन्सेक्स अपेक्षेप्रमाणे ३०० अंकांनी घसरला आणि ३६,१३६ वर स्थिरावला होता. या घसरणीमुळे सेन्सेक्स गेल्या पाच महिन्यांतील निचांकी पातळीवर पोहोचला. तर रुपयाने देखील आजच्या ३६ पैशांच्या घसरणीसह गेल्या आठ महिन्यांची निचांकी नोंद केली. त्यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ७२.०३ इतकी झाली आहे.

जागितक बाजारामध्येही सध्या मंदीचे वातावरण असून अंतर्गत समस्यांसह जागतिक बाजारातील निराशेच्या वातावरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर व शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.