भारताने हळूहळू शस्त्रांची आयात कमी करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यामुळे पुढील युद्ध स्वदेशी शस्त्रांनी लढले जाईल असा, विश्वास भारतीय लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे आयोजित एका परिषदेत ते बोलत होते.

जम्मू-काश्मीरमधील युवकांबाबत बोलताना ते म्हणाले की, या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच यापूर्वीही दहशतवादी हातात शस्त्रास्त्रे घेऊन आपले छायाचित्र सोशल मीडियावर टाकत असत. त्यांची ही पद्धत जुनीच आहे. बुऱ्हाण वाणीनेही आपल्या १०-१२ साथीदाराचा एकत्रित व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे ही नवीन बाब नाही. आम्ही आमचं काऊंटर इनसर्जन्सी ऑपरेशन चालूच ठेवू, असेही ते म्हणाले. जिथे जिथे निवडणुका असतील त्या योग्य पद्धतीने राबवण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही ते म्हणाले.

अरूणाचल प्रदेशवरून चीनबरोबर नुकताच झालेल्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, आता तो वाद मिटला आहे. दोन दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये फ्लॅग मीटिंग झाली होती. डोकलाम परिसरातही चीन सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने शस्त्रास्त्रांचे उत्पादन देशांतर्गत व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी नवे करार करताना सरकारने अशी उत्पादने देशात व्हावी यासाठी आग्रह धरल्याचे दिसून येते.