जगभरात करोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली असताना भारतातही या नव्या स्ट्रेनची संख्या १०९ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रिटनमधून आलेल्या नव्या करोनाच्या विषाणूने काळजीत भर टाकली आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या आता शंभरी पार गेली आहे. दरम्यान, नुकताच मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याचं एका रिपोर्टमधून समोर आल्याचं माध्यमांमध्ये चर्चिलं जात होतं.

तज्ज्ञ म्हणतात इतका धोकादायक नाही

तज्ज्ञ मंडळीचं म्हणणं आहे की, हा नवा म्यूटेंट जास्त धोकादायक नाही. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे डॉक्टर गिरिधर बाबा यांचं म्हणणं आहे की, हा म्यूटेंट सप्टेंबरमध्येच भारतात दाखल झाला आहे. जर हा इतकाच धोकादायक असता तर आतापर्यंत भारतात हाहाकार माजला असता.

जपानमध्येही नवा स्ट्रेन आढळला

दरम्यान, ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही नुकतेच करोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. करोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेले हे चारही रुग्ण ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन राज्यातून टोकीयोमध्ये परतले होते. करोनाचा हा नवीन स्ट्रेन आतापर्यंत जगामध्ये कुठेच आढळून आलेला नाही. तज्ज्ञांनी या स्ट्रेनसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून हा नवीन प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनप्रमाणेच अधिक जास्त संसर्गजन्य असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या नवीन स्ट्रेनचा खुलासा झाल्याने जगभरामध्ये पुन्हा खळबळ माजली आहे.